मन
करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण
डॉ
सारिका ठोसर
‘
तोरा मन दर्पण कहेलाए ’
‘
मन लागो मेरो यार फकिरीने ’
‘
मन रे तू काहे ना धीर धरे ’
‘
हम को मन की शक्ती दे ’
‘मन
के जीते जीत है, मन के हारे हार’
‘माझीया
मना जरा थांबना’
‘मन
चिंती ते वैरी न चिंती’
‘मना
सज्जना भक्ती पंथेचि जावे’ (मनाचे श्लोक-मनाचे उपनिषद)
‘
मन उधाण वार्याचे ’
‘
मेरे मन ये बता दे तू किस और चला है तू ’
हे सर्व मनाचे खेळ. पण हे मन आहे तरी कसे ?
अव्यक्त अदृष्य आणि अतिशय चंचल परंतु ज्याचा परिणाम मात्र संपूर्ण शरीरावर दिसतो.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात शेकडा 99% लोक मानसिक रोगी आहेत.रक्तदाब, हृदयरोग,
ताण, तणाव, डिप्रेशन, डायबिटीज इत्यादि सर्व रोगांचे उगमस्थान ‘मन’
हेच आहे. अशा मनाचा विचार करुन त्याला योग्य वळण देणे ही आजच्या काळाची खरी गरज
आहे. मनाला निरोगी आणि सशक्त ठेवणे नितांत आवश्यक आहे.
अशा मनाचा विचार करतांना आपल्याला
मानसोपचारक अशा संतमंडळींकडे जाणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यात्मशास्त्रातील
अंत:करण चातुष्ट्य म्हणजे काय हे प्रथम समजून घ्यायला हवे. अध्यात्मशात्राप्रमाणे
आपल्या अंत:करणात, मनात विचारांचा पहिला संकल्प, तरंग येतो. त्यानंतर मनात
संकल्पविकल्पाचे व्दंद सुरु होते. या व्दंदाचा निर्णय करण्याचे काम बुध्दीचे असते.
काम निश्चित झाले की चित्त त्याचे चिंतन सुरु करते आणि अहंकार ती गोष्ट करायलाच
हवी असा अभिनिवेश बाळगते. अशा प्रकारची संपूर्ण मानसिक प्रक्रिया प्रत्येक
कर्मामागे घडत असते. परंतु ती सवयीने इतक्या लवकर होते की हे विविध टप्पे आपल्याला
जाणवतही नाहीत. या अंत:करण चातुष्ट्यात मनाचे स्थान अत्यंत महत्वपूर्ण आहे. आता हे
मन आहे तरी कसे ? कोणी त्याला ईश्वरी तत्व मानतात, तर कोणी आत्मा, कोणी एनर्जी
(ऊर्जा), कोणी विचार तर कोणी मूर्तीमंत कल्पना.
श्री
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
वायां मन हे नांव|
नातरी
कल्पना सावयव|
जयाचेनि
संगे जीव|
दशा वस्तु ||
मन
हे सार्या स्पंदनांची, संवेदनांची जाणीव करुन देणारे इंद्रिय आहे. बालपणापासून
आपण अनेक गोष्टी शिकतो.पण मनाचे, विचारांचे व्यवस्थापन कसे करायचे ते शिकत नाही.
त्यामुळे आज आपल्या मनाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. याचे उदाहरणादाखल आपण पाहू
की समजा ‘एक
आई आपल्या लहान मुलाचा हात धरुन चालते आहे, ती त्याच्या पायाखाली कुठे काटे,
खड्डा, दगड, धोंडे, चिखल, पाणी वगैरे नाही ना? याकडे लक्ष ठेवते पण समजा तिने
त्याकडे लक्ष न देता बालकाला फरपटत नेले तर ते जसे रक्तबंबाळ होऊन दयनीय होईल’
तसेच काहीसे आपल्या मनाचे झाले आहे. असे चित्र मनात आल्यावर आपल्यालाच आपली कीव
येवू लागते. आपल्याला कोणी टोचून बोलले की त्याचा खड्डा पडतो, काटे टोचतात, दगड,
धोंडे लागतात, अपमान केला की जिवाचे पाणी पाणी होते, त्यावेळी आपण स्वत:बरोबर
एकांतातबसून मनाला हळुवारपणे समजावत नाही तर त्याला तसेच फरफटत पुढे नेतो. आपण
दुसर्याला वेळ देतो पण स्वत:ला नाही.
माझे
अस्तित्व म्हणजे माझे मन, माझे विचार हेच असते. माझ्या मनाच्या स्थितीवर मला
बाहेरचे जग चांगले किंवा वाईट दिसत असते. म्हणतात ना “दृष्टी
तशी सृष्टी”
माझ्या मेंदूने निर्माण केलेल्या संवेदनालहरी म्हणजे माझे अस्तित्व. माझ्या
समजुती, मते, धारणा, पूर्वस्मृति इत्यादि. पूर्व संस्कारामुळे माझी मते, माझे
विचार तयार होतात. हे संस्कार किती पक्के असतात याचे उदाहरण पाहू: ‘एका
गावात काही प्रवासी उंटांचा तांडा घेऊन जात होते.सर्व उंटांना रात्रीच्या मुक्कामी
बांधून ठेवले की हे लोक निर्धास्त होत. परंतु एकदा ते उंटांना बांधण्याची दोरी
घ्यावयास विसरले.रात्रीच्या मुक्कामी प्रश्न पडला की आता काय करावे ? त्यातील
एकानी गांवात जाऊन दोरखंडाचा शोध घेतला. पण तो काही मिळेना. एका दुकानदारानी कारण
विचारले तेव्हा त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली, दुकानदार उंटाजवळ आला त्यानी
हातात दोरखंड नसतांनाही तो जणुकाही हातात आहे असा आभास निर्माण करुन त्या उंटांना
बांधले आणि आश्चर्य म्हणजे सर्व उंट खाली बसले. सकाळ झाली. उंटांच्या मालकांनी
त्यांना उठायचा इशारा दिला पण ते उठेच ना. तेंव्हा पुन्हा दुकानदाराला बोलविण्यात
आले. दुकानदारानी रात्री जसे उंटाना बांधले होते तसेच अस्तित्वात नसलेल्या
दोरखंडाने त्यांना सोडले आणि उंट उठून उभे राहिले’ . आपलीही
अवस्था त्या उंटांसारखीच असते. अस्तित्वात नसलेल्या अनेक घटना, समजुतींना आपण खरे
मानून त्या दोरखंडानी स्वत:ला बंधनात टाकतो. हे बदलायचे असेल तर त्याचा पुनर्विचार
होणे गरजेचे आहे. मनाला जशी माहिती पुरवली जाते तसेच मनस्वास्थ राहते. म्हणूनच
सकाळी उठल्या उठल्य़ा पेपर वाचू नये असे म्हणतात. कारण आजकालच्या बातम्या कशा
प्रकारच्या असतात ते सर्व परिचयाचे आहे. मग तसेच विचार डोक्यात घोळत राहतात व
आपल्या घरात काही अघटित तर घडणार नाही ना अशीच आशंका सतत मनाला लागते. सकाळी पेपर
वाचन हे एक प्रकारे ‘जंक फुड’ आहे.
मनस्वास्थासाठी हानीकारक. म्हणूनच सकाळी काही मिनीटे तरी आपण ईशचिंतन, आत्मचिंतनात
घालविली तर ते दिवसभराचे टॉनिक होते.
आपल्या
मेंदुला शब्दांची भाषा कळत नाही तर अनुभवाचीच कळते. म्हणूनच स्वयंपाक करणे, सायकल,
स्कुटर चालविणे, पोहोणे, ध्यान करणे, एकाग्र होणे हे सर्व पुस्तके वाचून साध्य होत
नाही तर ते प्रत्यक्ष स्वता:ला करावे लागते. मनाचा आणखीन एक विशेष म्हणजे ते जितके
एकाग्र असेल तितके ते बलशाली होते. उदाहरणादाखल: ‘प्रकाश
साधारणपणे चारी दिशांना जातो त्यामुळे तो बलहीन असतो पण लेझर म्हणजे एका विशिष्ट
दिशेने जाणारा प्रकाश, तो अत्यंत बलशाली असतो’. एकाग्रतेचेही तसेच
आहे.विचारांवर जर ताबा ठेवला तर मनावर ताबा ठेवता येतो. विश्वात, विश्वमनात
विचारांची एक नदी सतत वाहत असते. त्यातील वैश्विक ऊर्जा कशी घ्यायची ते आपल्या
मनात विचारांचा एंटीना उभा आहे की नाही यावर अवलंबून असते. आपल्या पूर्वजन्मातीला
आंधळ्या विचारांना, प्रतिक्रियांना शिस्त लावण्यासाठीच खरे तर मानवाचा जन्म असतो.
म्हणून तर मानव जन्म अनमोल आहे. परंतु घडते मात्र उलट. जे आठवायला पाहिजे ते आपण
विसरतो आणि जे विसरायला पाहिजे ते आठवतो. त्यामुळे अनेक मानसिक रोग निर्माण होतात.
त्यातून शारीरिक व्याधींचा जन्म होतो.हे होऊ नये असे वाटत असेल तर मन:शांती आवश्यक
आहे. आपल्याकडे श्री विष्णुचे जे ध्यान “शांताकारम भुजग शयनम”
केले जाते ते अत्यंत मननीय व चिंतनीय आहे. भुजंगावर शयन करणार्या ईश्वरीतत्वानी
शांतीचा जणु आकारच धारण केला आहे. म्हणजे विष्णु अत्यंत शांत आणि स्थितप्रज्ञ आहे,
अशा विष्णुच्या ध्यानानी काही प्रमाणात तरी आपण शांत राहू शकतो.
जीवन
जगतांना एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे आपल्या बाहेरील परिस्थिती
व्यक्ति, घटना या आपल्याला बदलता येत नाहीत. बदल जर कोणाला, कुठे करायचा असेल तर
तो आपल्यातच करायचा असतो. आपण कोणत्याही परिस्थितीत सतत दुसर्याला दोष देत
असतो.आपली काहीच चूक नाही असेच आपल्याला सारखे वाटत असते.म्हणून आपण दु:खी असतो,
त्या ऐवजी अंतर्मुख होऊन विचार केल्यास जाणवते की दुसर्याला सुधारण्याचा विचार
करण्याआधी मी स्वत:मध्ये काय सुधारणा करु
शकतो ते प्रत्येकाने पाहिले तर तो अधिक सुखी होईल.
आपल्या मनात येणारे विचार आपोआप पूर्व
संस्कारांनी येत असतात जसे ड्रायवर नसलेली गाडी. त्याच विचांरावर आपण ताबा ठेवला
तर जेव्हा जे हवे ते आपल्या मनात येवू शकते. म्हणजे आपल्या विचारांचे आपणच
निर्माता असतो.प्रत्येक विचार ही आपलीच निर्मिती असते. मनात कोणता विचार किती किती
वेळ ठेवायचा हे देखील आपल्या हातात असते. दुसर्या शब्दात प्रत्येक विचाराला एक
आयुष्य असते. एखाद्या विचाराचा तरंग मनात आल्यावर त्याचे आयुष्य वाढवायचे की
संपवायचे हे आपण अभ्यासानी ठरवु शकतो. दुसरा आपल्याला त्यासाठी बाध्य करु शकत नाही
किंवा आपणही दुसर्याला बाध्य करु शकत नाही. आजच्या काळातील आदर्श उदा.म्हणजे
मुलांचे चैटिंगवर, फोनवर तासनतास वाया घालविणे आणि पालकांचे मुलांना त्यापासून
परावृत करण्याचे प्रयत्न, पण दोघेही आपापले विचार एकमेकांवर लादू शकत नाहीत.
आज वैज्ञानिक परिक्षणांनी असे सिध्द झाले आहे
की मनुष्य शांतचित्त असताना त्यांच्या मनात एक मिनिटात 25 ते 30 विचार येवून
जातात. म्हणजेच 24 तासात 40 ते 50 हजार विचार आणि चिंताग्रस्त मनात 50
हजाराच्यावर. हे विचार चांगले कमी आणि वाईट जास्त असतात. सकारात्मक कमी व
नकारात्मक अधिक असतात. नकारात्मक विचारांनी उर्जेचा अपव्यय होतो. आपण रिकामे
होतो.म्हणूनच स्वत:च्या स्वास्थ्यासाठी विचांराची गती कमी करणे अत्यावश्यक आहे.
यासाठीच आपल्याकडे ध्यान, धारणा आदि गोष्टी सांगितल्या आहेत. त्या परमशक्तीच्या
चिंतनानी आपण भारित होतो, उर्जा संपन्न होतो.मन आणि बुध्दीरुपी दोन पिना सतत
सतचिदानंदघन परमेशाच्यापायाशी जोडून ठेवल्या तर मन तेजस्वी होऊ लागते.
परमतत्व
हे आनंद स्वरुप आहे. आपण जेव्हा सकारात्मक विचार करतो तेव्हा आपण आनंदित असतो.
म्हणजेच परमेश्वरा जवळ असतो. या उलट आपण जेव्हा नकारात्मक विचार करतो तेव्हा आपण
दु:खी होतो. म्हणजेच परमेश्वरापासून लांब जातो. परमेश्वराजवळ वास करावयाचा असल्यास
सर्वात सोपा उपाय म्हणजे सकारात्मक विचार. परमेश्वराला सर्वगुण-संपन्न म्हणतात.
सदगुणांना आत्मसात करणे म्हणजेच परमेश्वराच्या निकट जाणें. या उलट दुर्गुणांचा वास
म्हणजे परमेश्वरापासून दूर जाणे.म्हणूनच आपल्याकडे षडरिपु - काम, क्रोध, लोभ, मोह,
मद, मत्सर, अहंकारापासून लांब राहण्यास सांगितले आहे. दुर्गुणांचा त्याग व
सदगुणांचा अंगिकार हे आनंदित राहण्याचे मर्म, रहस्य आहे. परंतु त्यासाठी मनाची
तयारी करणे अत्यावश्यक आहे. लेखाच्या सुरवातीलाच आपण पाहिले आहे की हे मन चांगल्या
गोष्टीसाठी तयार करणें किती कठीण आहे. या सर्वांसाठी सतत अभ्यासाची आवश्यकता आहे.
मनरुपी शिवलिंगावर सदविचारांची संतत धार धरणे आवश्यक आहे. यासाठी दिवसाच्या
सुरवातीला संकल्प करावा की मी आज काहीही झाले तरी माझा आनंद कमी होऊ देणार
नाही.(आनंद म्हणजे सतत नाचणें गाणें नव्हे ती तर उत्तेजना झाली. आनंद म्हणजे
समाधानाची, शांतीची सतत होणारी अनुभूती. ज्यामुळे आपण सतत स्फूर्तीवान, उर्जा
संपन्न राहतो. उर्जा म्हणजेच परमेश्वराचे स्वरुप. त्याचे अस्तित्व)दिवसभरात घडणार्या
घटनांचा आपण दृष्टा आहोत. असे समजून दिवसभरात घडणार्या घटनांकडे एका त्रयस्थाच्या
नजरेने पाहिल्यास जीवनाचे एक वेगळेच स्वरुप डोळ्यासमोर येते.
देव
माझ्यातच आहे. मला होणारी साध्या गोष्टींची जाणीव, माझं हसणं, माझं बोलणं, चालणं,
पाहणं हे सारे त्याच्या अस्तित्वाची साक्ष आहे. माझ्यात असलेली उर्जा, चेतना हे तो
असल्याचेच जिवंत लक्षण आहे. चैतन्य जसे माझ्यात आहे तसेच मन:शांती देखील माझ्याच
हातात आहे. फक्त मनाचे लगाम माझ्या हाती असणें आवश्यक आहे. आपण बाहेरील शत्रूंना
घाबरतो पण आपल्या मनातील षडरिपूंना जवळ करतो. त्यामुळेच आपला घात होतो.सुखाची
गुरुकिल्ली जशी माझ्या हातात आहे तसेच दु:खी राहण्यासही मीच कारणीभूत आहे. आपल्या
जीवनाकडे पाहिल्यास असे दिसते की आपल्याला बर्हिमुख दु:खापेक्षा (अपघात,
शारीरिक इजा, आवडत्या व्यक्तीचा मृत्यु, संपती नष्ट होणे इत्यादि) अंतर्मुख दु:खच
(पैसा नाही, यश नाही, कुणी प्रेम करणारे नाही, एखाद्दाने अपमान करणे इत्यादि) अधिक
असते आणि तेच आपण कुरवाळत बसतो. दु:खाचीही आपल्याला चटक लागते. दु:ख नसेल तर
आपल्याला चैन पडत नाही त्यामुळे याचे शारीरिक व मानसिक गंभीर परिणाम आपल्याला
भोगावे लागतात. उदा. कंबर, मान, पाठ इत्यादि दुखणे. डॉक्टरांकडे गेल्यावर एक्सरेत
काहीच निघत नाही पण दुखणें काही थांबत नाही अशी आपली अवस्था असते. हे एक प्रकारचे
मानसिक आजारपणच आहे. मन हे धृतराष्ट्रासारखे आंधळे असून बुध्दी ही गांधारी स्वरुप
डोळ्यांवर पट्टी बांधणारी आहे आणि त्यामुळेच दुर्विचारांचे कौरव सैन्य निर्माण
होऊन आपण आपला घात करुन घेतो. मानव जन्मात आपल्याला परमेश्वरानी विवेक बुध्दीची
देणगी दिली आहे. तिचा उपयोग करुन आपण आत्मविकास, व्यक्तित्व विकास करु शकतो.
महापुरुषांमधे
व सामान्यांमधे बाह्यत: काहीच शारीरिक फरक नसतो. जो काही फरक असतो तो अंर्तमनात
असतो. ज्यामुळे ते महापुरुष ठरतात व आपण सामान्य ठरतो. त्यांच्यात मन:शक्ती ठासून
भरलेली असते आणि आपण मन:शक्तीहीन असतो. आपल्यालाही जर निरोगी आणि आनंदी रहायचे
असेल तर सर्वप्रथम मनावर ताबा मिळवणे आवश्यक आहे. सुरुवातीला ते मन त्रास देते
कारण अनेक जन्मांची सवय त्याला असते. ते लाडावलेले असते. परंतु एकदाका मनाला कळले
की माझे काही चालणार नाही तर ते सुतासारखे सरळ होते व आपण म्हणू ते ‘मन’
ऐकू लागते.
श्री
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
कां
जें यया मनाचें एक निकें | जे हें देखिले गोडीचिया ठाया सोके |
म्हणोनि
अनुभवसुखचि कवतिकें | दावीत जाइजे ||
अशा
प्रकारे आपण पाहिले की मनाचा लगाम आपल्या हाती असेल तर जीवन सुफलित
होते.मन:स्वास्थ मिळविणे हे असाध्य नसून कष्टसाध्य आहे. एकदाका सदविचारांचा,
सदवर्तनाचा लाभ आपल्या लक्षात आला की मन ही आनंदासाठी सोकावते व ईशतत्व त्यासाठी
आपल्याला बळही देते.
असेच
मन:स्वास्थ आपल्या सर्वांना लाभावे ही ईशचरणी प्रार्थना करुन मनाच्या श्लोकानी
लेखाचा समारोप करते.
मना
पाप संकल्प सोडोनी द्दावा |
मना
सत्य संकल्प जीवी धरावा |
मना
कल्पना नको ते विषयांची |
विकारे
घडे हो जनी सर्व चीं ची ||
||जय
जय रघुवीर समर्थ||
..........
डॉ.सारिका
ठोसर
good one...
ReplyDeleteVery nice...
ReplyDeleteBut we have 3 types burdens
1 - responsibility
2 - target
3 - expectations...